Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच ठेवली आहेत. यामध्ये माढा, पंढरपूर आणि मोहोळ या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात शरद पवार यांचा नेमका प्लॅन काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
माढा, पंढरपूर आणि मोहोळ या मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची असा पेच निर्माण झाला आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, तसेच अभिजीत पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे, अॅड. मिनल साठे यांचा समावेश आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून देखील अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडून प्रशांत परिचारक यांचे नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळं शरद पवार नेमकी उमेदवारी कोणाला देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मोहोळ मतदारसंघातूनही अनेकजण इच्छुक यामध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजीत ढोबळे, संजय क्षीरसागर, तसेच रमेश कदम हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळं पवार कोणाला तिकीट देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.