Advertisement
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना रिंगणात उतरवले
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार असून राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादीजाहीर केली आहे. यात 22 उमेदवारांचा समावेश असून येवला, दिंडोरी, सिन्नर, नाशिक पूर्व, बागलाण, अकोले अहिल्यानगर शहर या सात जागांवर शरद पवार गटाने उमेदवारांची घोषणा केली आहे.
विरोधात कोण?
येवला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार शोधला जात होता. अखेर मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. गणेश गीते यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बागलाण विधानसभा मतदारसंघातून दीपिका चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याशी होणार आहे. तर सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात उदय सांगळे यांना तिकीट देण्यात आले आहे. उदय सांगळे यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अकोले विधानसभा मतदारसंघात किरण लहामटे यांच्या विरोधात अमित भांगरे यांना तिकीट देण्यात आले आहे.